‘समाज संकटात असताना मंदिरे बंद का? देव निरुपयोगी आहेत का?’

देव खरेच पळालेत का ?

-अभिषेक कासोदे

temple during lockdown
temple closed

कोरोना महामारी पसरली आणि प्रतिबंधाचा कुठलाही ठोस उपाय नसणाऱ्या या संसर्गाला रोखण्यासाठी लॉकडाऊन-lockdown/सामाजिक अलिप्तता या मार्गांचा अवलंब सुरु झाला. बहुसंख्य लोकांनी एकत्र जमू नये; गर्दी टाळावी यासाठी प्रत्येकाने आपापल्या घरात थांबणे आवश्यक झाले आणि गर्दी रोखण्यासाठी नियमित गर्दीची स्थाने तात्पुरती बंद करण्याचा निर्णय झाला. रेल्वे, शाळा,कॉलेज, ऑफिस, सिनेमागृहे आणि अर्थातच हमखास गर्दी असणारी मंदिरे/प्रार्थनास्थळे (विशेषतः मोठी तीर्थक्षेत्रे) बंद करण्यात आली. यामागचा उद्देश केवळ गर्दी टाळून सामाजिक अलिप्तता साधणे व संसर्ग रोखणे हाच होता आणि यातली कुठलीही स्थळे निरुपयोगी ठरली असे नाही. ना शाळा ना मंदिरे ना रेल्वे. मात्र आता केवळ त्यांच्या वापराबद्दल तडजोड करावी लागली. याचा अर्थ शाळांतील शिक्षक वर्ग संकट बघून पळाला काय ? की रेल्वेतील कर्मचारीवर्ग भिऊन घरात बसला ? पण मंदिर/प्रार्थनास्थळे/देव/श्रद्धा यांच्याबद्दल तोंडसुख घेणे सुरू झाले आणि सुरू झाला देव ‘पळाल्याचा’ युक्तिवाद.

समाजाला जगण्यासाठी संकटाशी लढताना बळ म्हणून श्रद्धा लागतात. ‘आपल्या पाठीशी कोणीतरी आहे’ या विश्वासासाठी देव लागतो. तो आहे की नाही ? असेल तर कोणत्या स्वरूपात आहे ? -हे प्रश्न अलाहिदा. पण ईश्वराबद्दलची श्रद्धा समाजाला धैर्य देते. त्यावर नैतिक अंकुश ठेवते. ज्यांना याची गरज भासत नाही त्यांनी मानू नये. समाज कुठे कोणावर जबरदस्ती करतो ? पण नाही ! ज्यांना श्रद्धा मान्य नसतात त्यांना आपले वेगळेपण जगाला ओरडून सांगायचे असते. ‘तुम्ही कसे भोळसट आहात आणि आम्ही मोजकेच कसे तर तर्कनिष्ठ’ हा बौद्धिक अहंकार गोंजारायचा असतो आणि त्यावरून समाजाच्या श्रद्धांना हिणवण्यातला आसुरी आनंदही उपभोगायचा असतो. एखाद्या आरोग्यविषयक संकटात डॉक्टरांचे महत्त्व साहजिकच वाढते आणि इतर घटकांसकट मंदिरांचे महत्त्वही कमी होते तेव्हा ही संधी साधून ‘देव निरुपयोगी/पळाले/लपले’ ही ओरड केली जाते.

डॉक्टरांची गरज

Coronavirus in India: Lucknow doctor treating Covid-19 patients in lockdown
India today

युद्धकाळात जशी सैनिकांची गरज असते, उत्पादन टंचाईत जशी कामगारांची गरज असते, निरक्षर समाजाला शिक्षकांची गरज असते, अन्नधान्यासाठी शेतकर्‍यांची गरज असते- तशी आजच्या आरोग्य आपत्तीत डॉक्टरांची गरज सर्वात जास्त झाली आहे. कुठलाही श्रद्धाळू माणूस यातल्या कुठल्याही घटकाची गरज किंवा महत्त्व नाकारत नाही. डॉक्टरही कधी ‘मंदिरे तोडा आणि आम्हाला पूजा’ असे म्हणत नाहीत. किंबहुना कोरोनासारख्या संकटाव्यतिरिक्त एरवीही देवभक्त माणूस आजारी पडल्यावर आधी दवाखान्यात जातो; मंदिरात नव्हे. श्रद्धा आणि आरोग्य यात शहाणा समाज गल्लत करत नाही. मंदिरांसाठी तो वैद्यकक्षेत्राचे महत्त्व नाकारत नाही. एखाद्या डॉक्टरने जीव वाचवल्यावर तो त्याचे देवाबद्दलच्या श्रद्धेनेच पाय धरतो. बहुतेक दवाखान्यांमध्ये देव्हारे असतात. बहुतेक डॉक्टर्सही श्रद्धाळू असतात. आणि बऱ्याच मोठ्या धार्मिक संस्थांनी दवाखाने बांधलेले आहेत. रुग्णांना बरे करण्याला समाज ईश्वरकार्यच मानतो.

विज्ञान आणि अध्यात्म

मात्र विज्ञानाचे फारसे ज्ञान आणि अध्यात्माची नम्रता नसणारे लोक ही गल्लत करतात. ते श्रद्धांना डिवचण्यासाठी विज्ञानाच्या आड लपतात. यांचे वैज्ञानिक कार्य सहसा नगण्य असते. अध्यात्माचे यांना वावडे असले तरी विज्ञानातही हे फारसे कर्तृत्व करत नाहीत. कारण सामाजिक धारणा (उदा. देव/धर्म) नाकारणापुरतेच यांचे सर्व विज्ञान मर्यादित असते. श्रध्देचा बाजार, कर्मकांड, नवससायासांचे प्रस्थ याबरोबरच विज्ञानावर वाढणारी बांडगुळेही धोकादायक आहेत. कारण विज्ञानाशी यांना कर्तव्य नसून उथळ वैज्ञानिकतेची आरडाओरड करण्यात यांचा स्वार्थ असतो.

देव खरेच पळाले का ?

Amritsar temples following coronavirus lockdown as Navratri begins
ANI news

देव खरेच पळाले का ? मंदिरांमध्ये देव आहेत, घरांमध्येही देव आहेत, लोकांमध्ये श्रद्धा आहेत. ना पूजा थांबल्या आहेत, ना लोकांचा देवावरचा विश्वास उडाला आहे. केवळ गर्दी टाळण्यासाठी स्वयंशिस्तीने मंदिरे (दर्शनासाठी) बंद(lockdown) ठेवली गेली आहेत तर देव पळाले कसे ? निरुपयोगी ठरले कसे ? अद्वैत तत्त्वज्ञानानुसार देव चराचरात मानला गेला आहे. अहं ब्रह्मास्मि/तत्त्वमसि विचारानुसार हिंदू जसे देवळातल्या मूर्तीत देव मानतात; तसेच दवाखान्यातल्या डॉक्टर/नर्स/सफाई कर्मचारी यातही देव मानतातच. इतर धर्मांतही ‘केवळ प्रार्थनास्थळांमध्ये देव आहे’ अशी अजिबात समजूत नाही. मग प्रार्थनास्थळे बंद ठेवल्याने ‘देव पळाले’ हा तर्क येतो कुठून ?

उपयुक्तता दवाखान्याची

Fever, Gandhi hospitals identified for Coronavirus patients
siasat

भौतिक जीवनात देवळापेक्षा जास्त उपयुक्तता दवाखान्याची आहे; अध्यात्मापेक्षा जास्त निकड विज्ञानाची आहे -हे कोणताही शहाणा आस्तिक नाकारणार नाही. मात्र केवळ अन्नवस्त्रनिवारा यावर जीवन सुखी झाले असते तर माणसाने कला-क्रीडा निर्माण केल्या नसत्या. विज्ञानाने माणसाचे सगळे प्रश्न यंत्रासारखे सुटले असते तर माणसाला श्रद्धांची गरज भासलीच नसती. बुद्धीची ही समजंस परिपक्वता हरवू न देणे हे वैज्ञानिक दृष्टीला पूरकच आहे.

‘देवपण’

You may soon be able to book Shirdi train, temple tickets together
DNA India

नुकतेच शिर्डीच्या श्री साई संस्थानाने 51 कोटी रुपयांची मदत कोरोना निवारण निधीस केली आहे. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवस्थानाने दोन कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. इतरही तीर्थस्थाने अनेक मार्गांनी या आपत्तीत समाजाला सहकार्य करत आहेत. हा पैसा भाविकांनी स्पष्टपणे ‘देवास’ वाहिलेला होता. कुठलातरी रोग येऊन तेव्हा शासनाला गरज पडेल ही कल्पना दानकर्त्यांना नव्हती. तरीही मंदिरे या देणग्या शासनाला देत आहेत कारण समाजाचा पैसा समाजासच विधायक मार्गाने परत करणे यातच ‘देवपण’ आहे हे ही मंदिरे जाणतात.

आपल्या देवाची आज्ञा/इच्छा हीच असेल याबद्दल भक्तांना शंका नाही. मंदिरांतील देणग्यांचा पैसा हा ट्रस्टींच्या लाभासाठी नसून समाजासाठीच वापरला जाणे अपेक्षित आहे. समाजाला गरज असतानाही तो वापरला जात नसेल तर त्यावर टीका झालीच पाहिजे. पण मंदिरात जाणारे- देवाला देणग्या देणारे लोकच आपत्तीच्या वेळी ‘देव कुठे आहेत’ हे विचारायला पात्र असतात. मंदिरांशी कसलाही संबंध नसणार्‍यांना मंदिरांनी/देवांनी काय करावे हे सांगण्याचा अधिकार नाही. जे झाले पाहिजे असे वाटते ते त्यांनी स्वबळावर करावे. बाकी दानपेटीत एक दमडीही न टाकणारे स्वघोषित विज्ञानवंत सामाजिक संकटात कुठे असतात ? त्यांचा दानधर्म नेमका कसा ? ते समाजाला किती मदत करतात ? त्यांची ठोस सामाजिक उपयुक्तता किती ? की ते समाजाला केवळ उपदेशाचे डोस पाजू शकतात- हे प्रश्न उरतातच !

हे अतरंगी पण वाचा

अतरंगी लेख आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया द्या

असेल अतरंगी लेख वाचण्यासाठी फॉलो करा फेसबुक आणि ट्विटर वर

error: Alert! चोरी नाही करायची रे