तेंडुलकरांच्या लेखनश्रेष्ठतेचे स्मरण

What Vijay Tendulkar Would Have Written Today-विजय तेंडुलकर

श्रेष्ठ मराठी लेखक विजय तेंडुलकर यांचा आज स्मृतिदिन. नाटककार ही त्यांची सर्वज्ञात ओळख असली तरी पत्रकार, पटकथाकार, सामाजिक कार्यकर्ता, संवादक, नट अशा अनेक भूमिकांतून ते वावरले. भारतीय रंगभूमीवर क्रांती घडवून आणणाऱ्या बादल सरकार, मोहन राकेश, गिरीश कार्नाड, अशा नाटककारांच्या फळीतले तेंडुलकर आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक दखलप्राप्त मराठी लेखक आहेत. ‘हिंसा’ हा तेंडुलकरांच्या विशेष चिंतनाचा विषय. त्यांच्या साहित्यात हिंसा शारीरिक, शाब्दिक, सामाजिक अशा विविध रुपात येते. गंभीर सामाजिक आशय असणारे त्यांचे बहुतांश लेखन असले तरी तेंडुलकरांनी निखळ अशी बालनाट्येही लिहिली आहेत.

आज जाणून घेऊया तेंडुलकरांच्या विलक्षण अशा एका नाट्य व एका चित्रपट कृतीबद्दल-

१. “शांतता! कोर्ट चालू आहे”-

Shantata! Court Chalu Aahe - Full Marathi Natak 2016-विजय तेंडुलकर

तेंडुलकरांचे सर्वात सखोल व आकृतिबंधाने सर्वश्रेष्ठ नाटक. अभिरूप न्यायालयाचे खेळ करणारा एक समूह गंमत म्हणून त्यांच्यातीलच बेणारे नामक एका युवतीवर खोटा खटला उभा करतो. बेणारेच्या व्यक्तिगत आयुष्यावर वाद घसरल्याने ती खटल्यातून निसटू पाहते. मात्र खोलीची बाहेरची कडी चुकून बंद झालेली असते. अडकलेली बेणारे दृढ मनाने खटल्यास तोंड देण्याचे ठरवते व बाहेर येत जातात प्रत्येकाचे धक्कादायक भेसूर चेहरे.

तेंडुलकरी ‘हिंसा’ यात भावनिक पातळीवर घडते मात्र ती प्रत्यक्ष शारीरिक हिंसेइतकीच, किंबहुना जास्त थरारक आहे. अरविंद व सुलभा देशपांडे यांच्या रंगायन संस्थेसाठी तेंडुलकरांनी हे नाटक लिहिले. नाटक लिहून पूर्ण व्हावे यासाठी नाट्यसंस्थेच्या लोकांनी तेंडुलकरांना एका खोलीत कोंडले, याची मजेदार आठवण तेंडुलकरांनी आत्मचरित्रात नोंदवली आहे.

फ्रेडरिक ड्युरेनमॅटच्या कादंबरीवर नाटकाची संकल्पना आधारलेली असली तरी अत्यंत अभिनव कथा व जिवंत पात्ररचना योजून तेंडुलकरांनी ही अजरामर नाट्यकृती लिहिलेली आहे. सखाराम बाईंडर, गिधाडे याप्रमाणे या नाटकात बाजारू सनसनाटी घटक नसल्याने रंगभूमीवर तसे तुलनेने कमी चाललेले, पण भारतातील सार्वकालिक सर्वश्रेष्ठ नाटकांपैकी हे नाटक आहे. ‘शांतता…’ चे अनुवाद व मंचन अनेक भाषांतून झालेली असून या नाटकासाठी तेंडुलकरांना कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त झाले.

याशिवाय कमला, कन्यादान, घाशीराम कोतवाल ही तेंडुलकरांची अन्य गाजलेली नाटके. यातील बरीच नाटके ही संवेदनशील विषयांवरील ज्वलंत भाष्यांमुळे वादग्रस्त ठरली तर काहींवर मंचनातील व भाषेतील धक्कादायक प्रयोगांमुळे अश्लीलतेचा ठपका लागला. बादल सरकारांच्या ‘पगला घोडा’, गिरीश कार्नाड यांच्या ‘तुघलक’ अशा समकालीन श्रेष्ठ नाटकांचे तेंडुलकरांनी अत्यंत ओघवते अनुवादही केलेले आहेत. स्वतःच्या लेखकीय ख्यातीचा गर्व न बाळगता तेंडुलकरांनी दि. बा. मोकाशी यांच्या आनंदओवरी कादंबरीची नाट्यसंहिताही संपादित केली.

२. अर्धसत्य-

‘अर्धसत्य’ (1983) हा गोविंद निहलानी दिग्दर्शित समांतर चित्रपट आहे. ओम पुरी, स्मिता पाटील, अमरीश पुरी;शफी इनामदार इत्यादींच्या चिंतनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या सदैव स्मरणात राहिलेला. मात्र अर्धसत्य आजतागायत सर्वाधिक ओळखला जातो तो तेंडुलकरांच्या अतिश्रेष्ठ पटकथेसाठी. श्री. दा. पानवलकर यांच्या ‘सूर्य’ या लघुकथेवर तेंडुलकरांनी लिहिलेली ही पटकथा. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात इतका भावनिक थरार असलेली सर्वांगाने बांधेसूद पटकथा दुसरी नाही.

Ardh Satya -विजय तेंडुलकर
wikipedia

अनंत वेलणकर नामक हळवा तरुण केवळ पित्याच्या हट्टाखातर पोलीस खात्यात नोकरी पत्करतो व व्यवस्थेत मुरता मुरता मुर्दाड बनत जातो. खलनायक रामा शेट्टीच्या रूपाने त्याच्या स्वाभिमानास ठेचणारे सभोवताल आणि त्यासमोर कोसळूनही पुन्हा उभा राहणारा अनंत वेलणकर यांचा सामना बघताना अक्षरशः जीवाचा थरकाप उडतो. शेवटी सुन्न करून टाकणारा अर्धसत्य चित्रपट म्हणजे खरेतर तेंडुलकरांनी दिलेला आदर्श पटकथालेखनाचा वस्तुपाठ आहे.

Vijay Tendulkar (Author of Silence! The Court is in Session)-विजय तेंडुलकर
goodreads

तेंडुलकरांनी यातून स्वतःच्या लेखकीय पंथालाही जबरदस्त छेद दिलेला आहे. साधारण डाव्या पुरोगामी विचारधारेत पोलीस व सुरक्षा दलांबद्दल सहानुभूती बाळगण्याचा प्रघात नाही. हिंसेसाठी केवळ पोलिसांना उत्तरदायी मानून त्यांच्याकडून यांत्रिकी आदर्श वर्तनाची अपेक्षा बाळगत तोंडसुख घेण्याचा एकंदर विचारवंती उथळपणा रूढ झालेला दिसतो. मात्र अनंत वेलणकरच्या रूपातून खाकी वर्दी मागील हतबल मानवी मन उलगडत त्याला हिंसेचे प्रवृत्त करणाऱ्या कटु वास्तवाचा तेंडुलकर शोध घेतात व अनेकांच्या वैचारिक पूर्वग्रहांना धक्के देतात.

याशिवाय श्याम बेनेगल दिग्दर्शित निशांत, मंथन, जब्बार पटेल दिग्दर्शित उंबरठा, सिंहासन, सामना अशा अशा प्रख्यात चित्रपटांच्या पटकथाही तेंडुलकरांच्या. नाटककार असतानाही चित्रपट माध्यमास पूर्णपणे समजून घेऊन त्याची शक्तिस्थळे ओळखून तेंडुलकरांनी पटकथा लिहिल्या आहेत.

Vijay Tendulkar
flickr

तेंडुलकर आपल्या लेखनातून उपदेशकाचा आव आणत आयती उत्तरे सुचवत नाहीत, तर प्रश्नाची भयानकता उघडी करत वाचकांना/प्रक्षकांना विचार करण्यास प्रवृत्त करतात. आपल्या नैसर्गिक कथावस्तू व पात्रांच्या जिवंत स्वाभाविक वर्तनामागील मर्म त्यांनी अनेकदा सांगितलेले आहेत- ते केवळ पात्रे उभी करतात आणि कथेच्या पटावर त्यांना मुक्तपणे सोडून देतात. मग पात्रांनी कसे वागावे हे ते ठरवत नाहीत, ते पात्रेच ठरवतात आणि त्यांच्या वर्तनाकडे तटस्थपणे बघणार्‍या तेंडुलकरांचे लेखन जन्म घेते!

  • अभिषेक कासोदे

हे अतरंगी सुद्धा वाचा

लेख आवडल्यास नक्की शेअर करा आणि आपल्या अमूल्य प्रतिक्रिया द्या 

असेच अतरंगी लेख वाचण्यासाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक आणि ट्विटर वर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Alert! चोरी नाही करायची रे