‘तृतीय रत्न’ बहुजन शिक्षणाचा आद्य जाहीरनामा

  • अभिषेक कासोदे

महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांच्या ‘तृतीय रत्न’ या साहित्यकृतीबद्दल.Mahatma Phule Books

tritiya ratna written by mahatma phule

परिचय – तृतीय रत्न ( Tritiya Ratna )-mahatma phule books 

तृतीय रत्न हे 1855 साली लिहिलेले नाटक आहे. त्याच्या रंगमंचीय प्रयोगांबद्दल फारसा इतिहास उपलब्ध नसला तरी त्याचे प्रथम प्रकाशन ‘पुरोगामी सत्यशोधक’ या त्रैमासिकात 1979 रोजी झाले. पंढरीनाथ पाटील यांच्याकडे सदर नाटकाची हस्तलिखिते होते व एका हस्तलिखितावर ‘तृतीय नेत्र’ असे शीर्षक आढळते. शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे या विचाराने फुल्यांनी त्यास तृतीय नेत्र/रत्न असे नाव दिलेले असावे.

तृतीय रत्न : महात्मा फुले कृत – Vijay Prakashan
vijay prakashan

जोतीरावांच्याच ‘गुलामगिरी’ ग्रंथात हे नाटक 1855 साली दक्षिणा प्राईझ फंडासाठी पाठवल्याचा उल्लेख आहे. मात्र समितीच्या भटसभासदांच्या नाराजीमुळे या लेखनास दक्षिणाप्राईझ नाकारले गेले असे फुले म्हणतात.

वयाच्या 28 व्या वर्षी 1855 साली फुलेंनी हे नाटक लिहिलेले आहे. व्यक्तिशः जोतिरावांची ही पहिलीच पूर्ण साहित्यकृती. या नाटकात तत्कालीन संगीत नाटकांप्रमाणे गाणी/पदे अजिबात नाहीत. नाटक संपूर्ण गद्यरूपात असून अंक-प्रवेश अशी त्याची विभागणी नाही. नाटकाचा आकारही लहान असून आजच्या परिमाणानुसार एखाद्या दीर्घांकाएवढी त्याची लांबी आहे. त्यात स्थळे व नेपथ्य विशेष नमूद न केल्याने प्रबोधनपर पथनाट्यासारखे त्याचे स्वरूप दिसते. सत्यशोधकी जलशांमध्ये सादर करण्यासाठीचे त्यामागे प्रयोजन असावे. मराठीतील पहिले ‘सामाजिक नाटक’ म्हणून तर ते निर्विवाद आहेच, मात्र 1855 सालापर्यंत मराठीत संहितारूपात लिहिलेले दुसरे कोणतेही नाटक ऐकिवात नाही. विष्णुदास भाव्यांचे ‘सीतास्वयंवर’ 1843 साली मंचित झाले असले तरी त्याला आधुनिक बांधेसूद संहिता नव्हती. मडगावकरांच्या व्यवहारोपयोगी नाटकाचे निर्मितीवर्ष 1856 आहे. त्यामुळे तृतीय रत्न हे मराठीतले आद्य नाटक व महात्मा फुले हे आद्य मराठी नाटककार ठरतात.

कथानक-

शिक्षणाच्या अभावाने कर्मकांडास भुलणार्‍या बहुजनांच्या दुर्दशेचे यात चित्रण आहे. देवभोळेपणा व अंधश्रध्देतून सामान्यांना बाहेर काढणे व शिक्षणाकडे वळवणे हा त्याचा हेतू आहे. नाटकात एकूण आठ पात्रे आहेत. एक अशिक्षित कुणबी व त्याची पत्नी जोगाई, भिक्षुक जोशी पतिपत्नी, जोशाचा बंधू दामू, एक ख्रिस्ती पाद्री व एक आगंतुक मुस्लिम गृहस्थ, आणि सूत्रधार म्हणून ‘विदूषक’.

कुणब्याची पत्नी जोगाई गर्भवती असते. तिच्या राशीला शनी असल्याची भीती घालत होणार्‍या बाळाला धोका असल्याचे जोशी सांगतो. त्यावर उपाय म्हणून श्रावण महिन्यात तेविस ब्राह्मण जेवू घालणे व अकरा दिवस नामजप चालवणे असे तो सुचवतो. ब्राह्मणभोजनास तो आपले सोयरे बोलवतो व जपास दामूला बसवतो. संपुर्ण विधीत जोशी कुणब्याकडून अनेकदा दक्षिणा उकळतो. चार रुपये मासिक उत्पन्न असणार्‍या कुणब्याला यासाठी दहा रुपये कर्ज काढावे लागते. होणार्‍या मुलाच्या जीवासाठी तो सगळे कर्ज व कष्ट सहन करतो. अखेर त्याच्या या दुर्दशेत एक ख्रिस्ती पाद्री भेटून त्याला उपदेश देत अंधश्रध्देपासून परावृत्त करतो व शिक्षणाचे महत्व पटवतो.

‘तृतीय रत्न’चे कथानक साधेसेच पण वास्तवदर्शी आहे. उत्तरार्ध चर्चात्मक व प्रबोधनपर आहे. त्यात फुल्यांनी साॅक्रेटीसच्या चर्चांप्रमाणे प्रश्नोत्तरांतून आपले विचार मांडले आहेत. पाद्री कुणब्यावर कुठलाही विचार न लादता त्याला एकेक प्रश्न विचारत उत्तरांमधून त्याच्याकडूनच तथ्य वदवतो. या नाटकातील विदूषकाचे पात्र अभिजात संस्कृत नाट्यपरंपरेतून घेतलेले असले तरी हा विदूषक अर्थहीन उथळ विनोद करत नाही. उपरोधिक भाषेत समाजप्रबोधनाचे कार्य विदूषकरुपी सूत्रधार करतो. त्याचे संवाद व्यंगात्मक पण विचारास प्रवृत्त करणारे आहेत. जसे की “जोशी जर मरणापासून माणसे वाचवतात तर इंग्रज सरकार औषधी उपाय एकीकडे ठेवून इस्पितळे मोडून ते काम जोशाच्या गळ्यात का बांधत नाहीत?”

ऐतिहासिक मूल्य-

नाटकात ब्रिटिशांबद्दल अनुकूल भाव आढळतो. त्यांनी दलितांना दिलेल्या संधीसमानतेचे विदूषक कौतुक करतो. मेजर कॅंडीच्या शैक्षणिक कार्याबद्दलही यात प्रशंसा आहे. परंतु एवढ्यावरून लेखकाची भूमिका सरसकट ब्रिटिशधार्जिणी म्हणता येत नाही. कारण फुल्यांनी नाटक लिहिले तो काळ भारतात पहिला ब्रिटिशविरोधी राष्ट्रव्यापी उठाव (1857) होण्याच्याही पूर्वीचा तसेच राणीच्या राजवटीआधीचा आहे. इंग्रजांचे जातिनिरपेक्ष धोरण आणि आधुनिक शिक्षणकार्याचे कौतुक करताना जोतीराव याच नाटकात विदुषकामार्फत बजावतात की पुढे मोगलांप्रमाणे इंग्रजांनी जर भारतियांना छळले तर भारतीय लोक शिवाजीमहाराजांप्रमाणे त्यांचे राज्य उलथवतील व अमेरिकेसारखे प्रजातंत्र अवलंबतील. (महात्मा फुल्यांचे हे बोल 92 वर्षांनी खरेही झाले!) पुढे जोतीरावांनीच ‘शेतकर्‍याचा असूड’ मध्ये शेतकर्‍यांच्या दयनीय स्थितीवरून ब्रिटिशांचा कठोर समाचार घेतला आहे. या नाटकात ज्ञानोदय व ज्ञानप्रकाश या तत्कालीन नियतकालिकांचे उल्लेख येतात. शिक्षणव्यवस्थेतील भ्रष्टाचारावर टीका होते. कुणबी आपल्या अशिक्षितपणाचे कारण पंतोजीने शाळेत दिलेली भेदभावाची वागणूक व केवळ सुपरिटेंडेटसमोर बहुजन विद्यार्थीसंख्या खोटी दाखवणे- हे सांगतो.

महात्मा फुले यांनी लिहिलेल्या ‘तृतीय रत्न’ या नाटकानेच महाराष्ट्राच्या प्रबोधनयुगाचा आरंभ झाला-mahatma phule books

जोतीरावांचे शिक्षण स्काॅटीश मिशनरी शाळेत झालेले असल्याने मिशनर्‍यांच्या शिक्षणकार्याचे त्यांनी स्वानुभवावरून कौतुक केले आहे. नाटकातील पाद्री ख्रिस्ती धर्माचा प्रचार करतो ते मिशनरी वृत्तीस स्वाभाविकच आहे. मात्र धार्मिकतेपेक्षाही कुणबी शिक्षणाचे महत्त्व स्वीकारतो- यामुळे नाटकाचा शिक्षणप्रसाराचा मुख्य हेतू ठळक व अबाधित राहतो. नाटकाच्या शेवटी कुणबी पतीपत्नी जोतीराव व सावित्रीबाई फुले यांच्या रात्रशाळेत शिकायला जाण्याचा निश्चय करतात. अशिक्षित शोषितांना विद्येचे महत्त्व पटवून देण्यासाठी महात्मा फुले यांनी लिहिलेल्या ‘तृतीय रत्न’ या नाटकानेच महाराष्ट्राच्या प्रबोधनयुगाचा आरंभ झाला व बहुजनशिक्षणाचा पाया रचला असे निश्चितपणे म्हणता येईल.

हे सुद्धा महत्वाचे आहे

लेख आवडल्यास नक्की शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया द्या

असेच अतरंगी लेख वाचण्यासाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक आणि ट्विटर वर

One thought on “‘तृतीय रत्न’ बहुजन शिक्षणाचा आद्य जाहीरनामा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Alert! चोरी नाही करायची रे