Geet Ramayan-जाणून घ्या गीत रामयणाबद्दल ह्या गोष्टी
गीत रामायणाची गीत रचना– Song Composition of Geet Ramayan

पुणे आकाशवाणी केंद्रावर सन 1954 च्या काळात सीताकांत लाड स्टेशन डिरेक्टर म्हणून कार्यरत होते आणि त्यांची अशी इच्छा होती की समाज प्रबोधन करणारा एखादा मनोरंजक कार्यक्रम आपल्या केंद्रावर प्रसारित करावा. त्यांनी लगेचच आपले जवळचे मित्र असलेले गीतकार ग. दि. माडगूळकर यांना ही कल्पना सांगितली आणि गदिमांनी त्वरित यावर काम सुरू केले आणि गीत रामयणाला सुरुवात झाली. गीतरामयणातील सर्व गीतांची रचना ही छंदवृत्तानुसार केली गेली. शब्दांचा योग्य वापर केल्याने हे एक सुश्राव्य काव्य झाले. गीतरामायण-Geet Ramayan म्हणजे गीतांची एक शृंखला आहे आणि यातील बऱ्याच गाण्याचा शेवट हा पुढील गाण्याशी किंवा प्रसंगासोबत जोडलेला आहे.
गीत रामायणात आपल्याला सर्व रसांचे दर्शन होते. म्हणजेच आज्ञा, मागणी, आर्जव, हट्ट,दुराग्रह, स्त्रीहट्ट, हाव, संताप,संशय, काळजी, समर्पण,मित्रभाव, सूड, कर्तव्यभाव, कान उघडणी, भक्ती असे अनेक रस आणि भाव या गीतांच्या शृंखलेत आहेत.
भारतात अनेक प्रकारचे रामायण आणि रामकथा लिहिल्या गेल्या आपण त्या कीर्तनाच्या आणि प्रवचनाच्या माध्यमातून ऐकत असतो. हे सर्व प्राचीन काळात लिहिले गेले. पण गदिमा आणि बाबूजींचे गीत रामायण हे आधुनिक काळातील रामायण ठरले. गीत रामायणाची ही 56 गीतांची मालिका 1955 सालच्या 1 एप्रिल रोजी राम नवमीच्या मुहूर्तावर सुरू झाली. आकाशवाणीचे पुणे केंद्र याचे प्रसारण करत होते.
गीत रामायणाचे संगीत-Music of Geet Ramayan

सुधीर फडके उर्फ बाबूजी यांनी भारतीय रागांच्या आधारावर स्वतः ही सर्व गीते संगीतबद्ध केली आणि त्यांनी सर्वप्रथम स्वतः गायन केले. यात प्रभाकर जोग, अप्पा इनामदार, अण्णा जोशी, सुरेश हळदणकर,केशवराव बडगे या वाद्यवृंदाने बाबूजींना साथ दिली.
त्या त्या प्रसंगानुरूप अशा एकूण 36 रागांचा वापर या गीत रामायणाच्या संगीतात केला आहे. म्हणूनच त्या त्या प्रसंगाचा भावार्थ या भारतीय रागांमुळे अतिशय काळजाला भिडतो. हेच या गीतरामायणाचे यश म्हणावे लागेल .
या गायकांनी गीत रामायण गायले
सुधीर फडकेंबद्दल जाऊन घेण्यासाठी www.sudhirphadake.com या लिंक वर जा
सुधीर फडकेंनी संगीतबध्द केलेली ही गीते पुढे डॉ. वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, सुरेश हळदणकर, राम फाटक, लता मंगेशकर, ललिता फडके,मंदाकिनी पांडे, प्रमोदिनी देसाई,बबन नावडीकर, जानकी अय्यर,सुमन माटे, कालिंदी केसकर या गायकांनी गीत रामायणातील गीते गायली आहेत.
गीत रामायणाचे प्रसारण – Telecast of Geet Ramayan

सीताकांत लाड पुणे आकाशवाणीचे डायरेक्टर यांच्या पुढाकाराने रामनवमी 1 एप्रिल 1955 रोजी सुरू झालेली ही गीत रामायणाची 56 गीतांची शृंखला बरोबर 19 एप्रिल 1956 च्या रामनवमी ला पूर्ण झाली.
या गीत रामायणाचे नंतर देशात आणि विदेशात तब्बल 1800 प्रयोग केले
रामानंद सागर यांच्या रामायणातल्या ४ कथा ज्या वाल्मीकींच्या रामायणात सापडणाऱ्या नाही
पहिल्या दिवशी गीताची प्रत हरवली
कार्यक्रमाची वेळ आकाशवाणीने कळवली होती. हा कार्यक्रम थेट प्रसारीत होणार होता. कार्यक्रमाची वेळ जवळ आली. सर्व प्रेक्षक उत्सुकतेने या पहिल्या गीताची वाट पाहत होते. पण अचानक गीताची प्रत सापडेनाशी झाली आणि त्याच क्षणी गदिमांनी नवीन गीत लिहिले. आणि बाबूजींनी त्याला चाल लावली आणि पहिले गीत लोकांसमोर आले.
गीत रामायणाचे पहिले गीत
“स्वये श्री राम प्रभू ऐकती,कुश लव रामायण गाती “
या गीताने गीतरामायणाची सुरुवात झाली आणि ही मालिका 56 गीतांपर्यंत पोहोचली गदिमांचे शब्द आणि बाबूजी म्हणजेच सुधीर फडकेंचे स्वर अशी अप्रतिम सांगड जुळली आणि ही गीतांची मालिका अल्पावधीतच प्रसिद्ध झाली.
गदिमांना आधुनिक वाल्मिकीची पदवी मिळाली.

ग.दि.मा चे गाणे ऐकण्यासाठी www.gadima.com वर जा
टिळकांच्या गायकवाड वाड्यात गीत रामायणाचाचा कार्यक्रम झाला. यात अनेक प्रतिष्ठीत कार्यक्रमाला उपस्थित होते. या वेळी दत्तो वामन पोतदारांनी गदिमांना ‘आधुनिक वाल्मिकी’ ही पदवी बहाल केली.
ही रामकथा सर्वांना सहज कळली

उपलब्ध असलेल्या रामकथा ह्या अतिशय कठीण भाषेत होत्या. त्या समजण्यास अतिशय अवघड जात होते. सर्वसामान्यांसाठी ही रामकथा गदिमांनी अगदी सोप्या भाषेत मांडली आणि ही समजण्यास अतिशय सोपी होती. अर्थात हे शब्द आपल्या स्वरांच्या माध्यमातून पोहोचवले ते बाबूजींनी म्हणजेच सुधीर फडकेंनी.
स्वातंत्रवीर सावरकरांचे डोळे जेव्हा पाणावले.
शिवाजी मंदिरात कार्यक्रम होता आणि सावरकर तो कार्यक्रम बघायला उपस्थित होते. त्या वेळी जेव्हा बाबूजी
“दैव ज्यात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा!” गाऊ लागले. सावरकर तल्लीन होऊन गीत ऐकत होते. एक एक कडवे पुढे सरकत होते आणि बाबूजींनी नवीन कडव्याची सुरुवात केली.

“नको आसू ढाळु आता पूस लोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास, अयोध्येत हो तू राजा, रंक मी वनीचा”
हे ऐकताच सावरकरांचे डोळे पाणावले. यावर बाबूजी म्हणतात की त्या दिवशी मला स्वरांचे खरे महत्व कळाले.
गीत रामायणाची भाषांतरे-Translation of Geet Ramayan
हे गीत रामायण एवढे प्रसिद्ध झाले की आजपर्यंत गीत रामायणाची अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली. हिंदी, गुजराती, बंगाली, कानडी, आसामी, तेलगू, मल्याळम, संस्कृत तसेच कोकणी या भाषांमध्ये ही गीत रामायण श्रोत्यांना ऐकायला मिळाले आणि विशेष म्हणजे भाषांतर होऊनही या भाषांतरात मूळ अर्थाला किंचित ही कुठे धक्का लागला नाही. आजही आपल्या मूळ अर्थासहित बाबूजींनी दिलेल्या चालींवरच ही गीते गायली जातात.

गीत रामायणाशी निगडित अश्या बऱ्याच गोष्टी आहेत. बाबूजींनीही आपल्या ‘जगाच्या पाठीवर’ या आत्मचरित्रात याबद्दल लिहिले आहे. श्रीधर फडके म्हणजेच बाबूजींचे सुपुत्र. ते जेव्हा गीतरामायण सादर करतात त्या वेळी बऱ्याच गोष्टी सांगतात. गीतरामायण हे एक अजरामर काव्य होऊन गेले आहे. आजही अनेक लोकांच्या आठवणी त्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. प्रत्येकाने या अजरामर कलाकृतीचा आस्वाद नक्कीच घ्यावा.
हे अतरंगी सुद्धा वाच
- रामानंद सागर यांच्या रामायणातल्या ४ कथा ज्या वाल्मीकींच्या रामायणात सापडणाऱ्या नाही
- तानसेनला हरवणारा तो गायक कोण होता
लेख आवडल्यास नक्की शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया द्या
असेच अतरंगी लेख वाचण्यासाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक आणि ट्विटर वर
Pingback: Shivaji Maharaj-छत्रपती शिवाजी महाराजांना विषबाधा झाली होती का ? - अतरंगी क्राऊड
Pingback: money heist-एका फ्लॉप सुपरडूपर हिट मालिकेची कथा - अतरंगी क्राऊड