या चित्रपटाने केली होती नऊ वर्षांपूर्वीच आजच्या स्थितीची कल्पना

अभिषेक कासोदे-

Contagion | ‘काॅन्टॅजन- आजच्या संकटाची पूर्वकल्पना देणारा थरारपट’

सध्या जगभर करोनाने(corona) थैमान घातले आहे. चीनच्या वुहान प्रांतातून पसरलेल्या या विषाणूची आतापर्यंत चार लाखापेक्षा अधिक जणांना बाधा झालेली असून.अठरा हजारांपेक्षा अधिक जण मृत्युमुखी पडले आहेत. इटलीत दोन तृतीयांश लोकसंख्येला याने ग्रासले असून.आता तिथली परिस्थिती शासनाच्या केव्हाच नियंत्रणाबाहेर गेलेली आहे.तर भारतासारख्या मोठ्या देशात आजवर कधी नव्हे ते एकवीस दिवस लाॅकडाउन या विषाणूमुळे घोषित केले गेले आहे. एवढे असूनही या विषाणूविरोधात कोणतीही प्रतिबंधक लस अद्याप तयार नाही.आणि अमेरिकेसारखी महासत्ताही या विषाणूपुढे हतबल झालेली आहे.

Image result for Contagion movie
indiewire

पण तुम्हाला सांगितले की आजच्या या परिस्थितीची हुबेहूब कल्पना नऊ वर्षांपूर्वी एका चित्रपटाने मांडली होती.तर तुमचा विश्वास बसेल ? हे तसे अविश्वसनीयच आहे.हे कारण 2011 साली प्रदर्शित झालेल्या ‘काॅन्टॅजन’ (Contagion) या हॉलिवूडपटातील कथानकाशी आजच्या करोना निर्मित संकटाचे विलक्षण साम्य आहे. 1918 च्या स्पॅनिश फ्लूने जगभर घातलेल्या थैमानावर चित्रपट करावा अशी स्टिव्हन साॅडरबर्ग या दिग्दर्शकाची कल्पना होती. मात्र याच काळात 2009 साली ‘स्वाइन फ्लू’ नावाने प्रसिद्ध झालेल्या H1N1 विषाणूच्या रोगाची साथ जगभर पसरली. हा रोग जरी मर्यादित राहिलेला असला.तरी या पार्श्वभूमीवर अनेक वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन भविष्यातील मोठ्या धोक्याची कल्पना करत,साॅडरबर्गने काॅन्टॅजन हा वैद्यकीय थरारपट बनवला.

या चित्रपटानुसार हाॅंगकाॅंगपासून उद्भवलेला MEV-1 हा विषाणू संसर्गाद्वारे अमेरिकेत पोहोचतो. खोकला, ताप, श्वास घेण्यात अडथळा- अशीच लक्षणे असल्याने हा सामान्य फ्लू नाही.हे कळायला वैद्यकीय यंत्रणेला वेळ लागतो. तोपर्यंत विषाणूचा समाजात फैलाव झालेला असतो. पृष्ठभागावर अनेक तास टिकणार्‍या या विषाणूचा संसर्ग हाताद्वारे नाकाला स्पर्शाने पसरत जातो.त्यामुळे अमेरिकेसकट जगात लाॅकडाऊनची परिस्थिती निर्माण होते.शाळा-ऑफिसेसला सुट्टी द्यावी लागते.लोकांमध्ये हलकल्लोळ माजतो. रुग्णांना क्वारेंटीन म्हणजे विलगीकरणात ठेवावे लागते. तुमच्या लक्षात आले असेल की करोनाने आत्ता आलेल्या जागतिक संकटाशी किती साधर्म्य आहे. विशेष म्हणजे चित्रपटातील हा विषाणूसुद्धा वटवाघळातूनच माणसात आलेला असतो. करोनाबद्दल अनेक तज्ञांचे हेच मत आहे.

Image result for Contagion movie
npr org

मग हा विषाणू आला कसा ?

तो जैविक दहशतवादाचा प्रकार आहे का ? त्याला जबाबदार कोण ? त्यावर घडणारे राजकारण, लोकांचे हरवणारे सौजन्य, अन्नधान्याचा पडणारा तुटवडा, औषध आणि वैद्यकीय साधनांचा काळाबाजार- असा आपत्तीचा थरार चढत जातो. या विषाणूने एकूण केवढे नुकसान होते.आणि त्यावर माणूस कसा तोडगा काढतो.हे मात्र तुम्ही चित्रपटातच बघितले पाहिजे. मारियन कोटीलार्ड, मॅट डॅमन, लाॅरेन्स फिशबर्न अशा नटांसोबत यात सर्वांची आवडती केट विन्स्लेट सुध्दा आहे. लोकप्रियतेसोबतच या चित्रपटास अनेक जागतिक पुरस्कार मिळालेले आहेत.

Image result for contagion movie scene
vanity fair

काॅन्टॅजन चित्रपटाशी आजच्या संकटाचे साधर्म्य हा केवळ योगायोग नाही. आधुनिकतेच्या नादात वर्षानुवर्षे माणूस करत आलेल्या घोडचुका.निसर्गाच्या इशाऱ्याकडे केलेला कानाडोळा- हे सर्व आपल्याला नुकसानाकडे नेणार हे निश्चित होते. साॅडरबर्गसारख्या दिग्दर्शकाची जागृत दृष्टी हे ओळखून आजची कल्पना करू शकली. जगाने मात्र त्याला त्यावेळी केवळ एक उत्तम चित्रपट म्हणून सोडून दिले. आज या गाफीलपणाचे फळ माणूस भोगत असताना काॅन्टॅजन चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे. करोनाच्या लाॅकडाऊनमुळे आपण घरात बंदिस्त असताना हा चित्रपट बघणे थरारक अनुभव असेल. वास्तवात अजूनही वेळ गेलेली नसून संयमाने आपण करोनासारख्या राक्षसाचा काॅन्टॅजन होण्यापासून रोखू शकतो.

सौजन्य -अभिषेक कासोदे

Image result for contagion movie scene
cinesnark

लेख आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया द्या

अजून नवनवीन लेख वाचण्यासाठी लाईक करा फेसबुक आणि ट्विटर वर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Alert! चोरी नाही करायची रे