नेमाडे नावाचे प्रतिभासंपन्न स्फोटक!

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लोकप्रिय लेखक भालचंद्र नेमाडे यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या साहित्याचा घेतलेला वेध. -अभिषेक कासोदे

Bhalchandra Nemade - भालचंद्र नेमाडे
scroll

मराठी साहित्य- कलाक्षेत्राचे काही पूर्वापार रूढ संकेत आहेत. त्यातल्या कथा कृष्णावारणेच्या खोऱ्यात किंवा शहरी मध्यमवर्गीय घरात घडतात. नायक बहुदा पुण्याच्या पेठांमधला किंवा मुंबईच्या चाळीतला असतो. त्याचा पेशा शिक्षकी, कारकुनी किंवा थेट शेती असते. गाव कोकणातले छानपैकी नारळीपोफळीच्या बागांचे असते. ग्रामीण बोली ‘म्हंजी, वन्सं, व्हय-नाय, आमास्नी-तुमास्नी’ अशी असावी लागते. आणि ‘महाराष्ट्र’ म्हणजे विदर्भ, मराठवाडा, खानदेश सोडून उरलेला भाग असतो!

Bhalchandra Nemade-भालचंद्र नेमाडे
veethi

आज हे चित्र बरेच व्यापक होऊन महाराष्ट्राचे वैविध्य साहित्यात उतरू लागले असले, तरी पन्नाससाठ वर्षांपुर्वी ही संकुचितता टिपेला असताना “मी पांडुरंग सांगवीकर. आज उदाहरणार्थ पंचवीस वर्षांचा आहे” या वाक्याने तिला पहिल्यांदा सुरूंग लावला. हे बोलणारा नायक पांडुरंग खानदेशातून, तापी खोर्‍यातून आलेला होता. पुण्यात शिकून बेरोजगार बसलेला आपली कथा सांगत होता ‘कोसला’ नावाने, आणि त्याच्या कहाणीसह हा कोसला शब्दसुध्दा मराठी साहित्याला संपूर्ण अपरिचित होता.

कोसला by Bhalchandra Nemade
goodreads

भालचंद्र नेमाडे यांच्या पहिल्या कादंबरीपासून त्यांचे सारे साहित्य आणि भूमिका या अशाच प्रस्थापिताला हादरा देणार्‍या राहिल्या आहेत. 1963 साली आपल्याच सांगवी (जिल्हा- जळगाव) या गावी वयाच्या पंचविसाव्या वर्षी अवघ्या तीन आठवड्यांत नेमाड्यांनी ही कादंबरी लिहून काढली आणि सार्‍या मराठी साहित्यविश्वाचे डोळे विस्फारले. खुद्द पुलंनी कोसलावर प्रशंसापर लेख लिहिला आणि मराठी साहित्यात सुरू झाला अत्यंत लोकप्रिय असा ‘नेमाडपंथ’. पुढे चांगदेव चतुष्टय, ‘हिंदू’ या कादंबर्‍यांतून, ‘देखणी’ या काव्यसंग्रहातून आणि ‘टीकास्वयंवर’ सारख्या समीक्षाग्रंथांतून हा प्रवाह पुढे वाहत राहिला आहे.

कोसला - भालचंद्र नेमाडे
goodreads

‘कोसला’ या खानदेशी शब्दाचा अर्थ आहे कोश. कोशातून पाकोळी बाहेर येते त्याप्रमाणे जगरहाटीचा अनुभव घेणार्‍या सांगवीकरचे हे आत्मकथन. सांगवी गावाहून पुण्याच्या फर्ग्युसन काॅलेजला शिकायला येणारा सांगवीकर म्हणजे बर्‍याच अंशी तरूण नेमाड्यांच्याच अनुभवांचे प्रतिबिंब आहे. लहान बहीण मनू हिच्या मृत्यूची वार्ता ऐकून तापल्या दुधाने खोलीवरील मांजरीचे तोंड भाजणारा, रात्रीबेरात्री पुण्याच्या रस्त्यांवर फिरताना पोलिसाने हटकल्यावर ‘माझी बहीण मेली’ असे सांगणारा आणि अजिंठ्याच्या सहलीला गेल्यावर बुद्धाच्या ‘दगडी जिवणीवरील हास्याकडे’ बघत चिंतनमुग्ध होणारा पांडुरंग वाचताना वाचकाला आजही त्यात स्वतःशी भेट होते.

Jhool - Bhalachandra Nemade
akshardhara

पुढे नेमाड्यांनी लिहिलेल्या चांगदेव चतुुष्टयात चार कादंबर्‍या आहेत- बिढार, हूल, जरीला आणि झूल. चांगदेव पाटील या पात्राचे शिक्षण, मुंबईतील नोकरीशोध आणि अखेर निमशहरी भागात प्राध्यापकी असा जीवनपट यात आहे. (स्वतः नेमाडेही अहमदनगरला प्राध्यापक होते.) संस्कृती, भाषा, समुदायांचा गुंफलेला एवढा विस्तीर्ण पट बघताना वाचक थक्क होतो. चांगदेवची कहाणीही नेमाड्यांच्याच जीवनावर आधारलेली असली तरी कोसलातील पांडुरंग सांगवीकर आणि चांगदेव या पात्रांमध्ये ठळक फरक आहे. पांडुरंग बंडखोर आहे, चांगदेव मात्र पुष्कळ शांत-सहनशील आहे. बहुदा लेखकाचे वय वाढल्याने येणार्‍या पोक्ततेचा प्रभाव हा पात्रावर पडला असावा. मात्र कोसला वाचून संपल्याचे दुःख वाटले तर लगेच चांगदेव चतुष्टय हाती घ्यावे, इतकी त्यात नेमाडपंथी कथनाची सलग मजा आहे.

हिंदू by Bhalchandra Nemade
good reads

पुढे येते नेमाड्यांची अलिकडच्या काळातली ‘हिंदू- जगण्याची समृध्द अडगळ’ कादंबरी. यातला नायक खंडेराव आणि त्याची पार्श्वभूमीचे सुध्दा नेमाड्यांच्या स्वतःशी साधर्म्य असले तरी इतिहास संशोधक असणारा खंडेराव नेमाड्यांच्या रूढ प्राध्यापकी साच्यापासून बराच दूर जातो. (खंडेराव पात्र आणि त्याचा आत्मसंवाद हा ट्रेंड समाजमाध्यमांवर बराच प्रसिध्द आहे.) हडप्पामोहेंजोदडोच्या उत्खननापासून ते स्वतःच्या गावाच्या लोकपरंपरांपर्यंत त्याला उमजणारा हिंदू संस्कृतीचा भव्यपट या कादंबरीत आहे. नेमाड्यांच्या बाकी कादंबर्‍यापेक्षा यात राजकीय आणि सामाजिक भाष्ये जास्त आहेत आणि ही कादंबरी व्यक्तिगत कथनाच्याही बरीच वर उठते.

तुकाराम - भालचंद्र नेमाडे
amazon

नेमाड्यांना साहित्य अकादमी समीक्षेसाठी मिळाला (‘टीकास्वयंवर’). भाषिक अभ्यासासाठीही त्यांनी लेखन केले (‘तुकाराम’). मात्र या कादंबरी-समीक्षेच्या ख्यातीमध्ये नेमाड्यांत दडलेला अत्यंत विलक्षण कवी तसा दुर्लक्षित राहिला. ‘देखणी’ या पन्नासेक कवितांच्या संग्रहात हा कवी “आम्हाला अपघात होवो तडकाफडकी मरण येवो” अशी अजब प्रार्थना करतो तेव्हा नेमाड्यांच्या कादंबर्‍यांचे सारे नायक एकेका ओळीत एकवटतात. हिरवे रान, निळे पाणी, चंद्रचांदणे या साजुकपणात फसलेल्या साठसत्तरी मराठी कवितेला हिसक्याने नेमाडे बाहेर काढतात आणि त्यावर ‘आयुष्याचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा’ फोडतात!

Nativism (Desivad): Bhalchandra Nemade: देशीवाद
amazon

नेमाड्यांचा ‘देशीवाद’ हा फार चर्चिला जाणारा विषय आहे. त्यांचे नायक गावाहून येतात, ते गाव- तिथले जीवन हे शहरी लेखकांच्या कागदी कल्पनांचे नसते तर नेमाड्यांनी स्वतः जगलेले अस्सल स्वतःचे असते. ते नायक शहरात जातात तेव्हा त्यांच्यातील ग्रामीण मूल्यांचा शहरी चकचकाटाशी संघर्ष उडतो आणि मातीशी घट्ट रुजलेले देशीपण जिंकते. मात्र हे देशीपण सनातनी नाही, ते आधुनिकतेला नाकारतही नाही. मात्र उसन्या आधुनिकतेचा दंभ फाडून त्यामागे लपलेला स्वार्थी संकुचितपणाही उघडा करते. खरेतर नेमाड्यांच्या लेखनातून डोकावणार्‍या या विचाराला ‘वादा’चे रूप देऊन काथ्याकूट करण्यापेक्षा त्याचा निखळ आस्वाद घेणे वाचक म्हणून जास्त फायदेशीर आहे.

Modi: Nemade's works will inspire generations-'ज्ञानपीठ' पुरस्कार -भालचंद्र नेमाडे
‘ज्ञानपीठ’ पुरस्कार 2014 – the hindu

भारतीय साहित्यात सर्वोच्च मानला जाणारा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळूनही नेमाडे साहित्य संमेलनांच्या तंबूत फिरकले नाहीत. लेखकांच्या ‘अमुकतमुकवादी’ कळपात ते रमले नाहीत आणि फायद्यातोट्याची पर्वा करत योग्य वाटेल ते बोलण्यासाठी कचरले नाहीत. सांगवीकरची बंडखोरी, चांगदेवचा समंजसपणा आणि खंडेरावचे चिंतन त्यांनी केवळ लेखनापुरतेच ठेवलेले नसून ते वेळोवळी जगलेही आहेत. प्रस्थापनाची पुनर्मांडणी करताना अगदी स्वतःचाही गड ढासळण्याची फिकीर न बाळगणारे ‘भालचंद्र वनाजी नेमाडे’ हे लोकप्रिय स्फोटक आज ब्याऐंशी वर्षांचे झाले आहे! त्यानिमित्त नेमाडेसरांना प्रणाम आणि निरोगी दीर्घारोग्यासाठी शुभेच्छा!

हे सुद्धा वाचा

लेख आवडल्यास नक्की शेअर करा आणि आपल्या अमूल्य प्रतिक्रिया द्या 

असेच अतरंगी लेख वाचण्यासाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक आणि ट्विटर वर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Alert! चोरी नाही करायची रे